शनिवार, २० जुलै, २०१३

गुरु पौर्णिमा ….

गुरु पौर्णिमा …. साक्षात शिष्यांनी गुरुप्रती भक्तिभावाने साजरा केलेला आनंद सोहळाच. का करतो आपण गुरु पौर्णिमा …


आता तर इंटरनेट वर विकिपीडिया, यु ट्यूब, स्लाईड शेअर , तसेच शेकडो लाखो संकेत स्थळे आहेत जी आपणास घरबसल्या आपल्या संगणकावर व मोबाईल वर क्षणार्धात माहितीचा खजिनाच सादर करतात, अतिशय अवघड गोष्ट हि अत्यंत सुकर करून दाखविली जाते वरील संकेत स्थळांवर, तरी देखील आपण आताही गुरूला तितकच महत्व द्यायचं का अजूनही ?

हो…. आपणास गुरूची गरज जीवनातील प्रत्येक वळणावर हवीच असणार आहे.

कोणतही क्लिष ज्ञान ,एखादी अवघड कल्पना सुगमतेने गुरूच आपणास उलगडून दाखवू शकतो , सांगू शकतो , व आपल्या मनावर बिंबवू हि शकतो.

खरा गुरूच आपल्या शिष्याची खरी क्षमता ओळखू शकतो व त्यास त्याच्या क्षमतेनुसार मार्गदर्शन करू शकतो व हीच गोष्ट इंटरनेट वरील माहितीत दिसून येत नाही.

पूर्वीच्या काळी गुरु आश्रमात ज्ञान प्रदान करत असत. त्याच्या शिष्यांना साक्षात गुरूच्या सानिध्यातच पूर्ण शिक्षण होई पर्यंत राहावे लागत असे त्यामुळे जो शिष्य श्रद्धापूर्वक व भक्ती भावाने विद्या अर्जन करित असे तो गुरूला प्रिय असे व त्यासच गुरु ज्ञानाची पुढील द्वारे खुली करीत असे. आपला आयुर्वेद , संस्कृत व्याकरण, मंदिरांची मनोहारी रचना, राजवाडे व किल्यांची कल्पक निर्मिती , गणित शास्त्र, हे सर्व शेकडो वर्षापूर्वीही अत्युच्च पातळीवर असण्याच कारण म्हणजे शिष्यांनी गुरुप्रती दाखविलेली श्रद्धा व भक्ती हीच होत .

नालंदा व तक्षशीला विद्यापीठे हि जागतिक पातळीवर नावाजलेली ज्ञान ग्रहणाची केंद्रे भारतात असण्याच म्हणूनच आश्चर्य वाटण्याच कारण नाही.

आपण हल्ली बातम्या वाचतो कि भारतातील विद्यापीठांमधून सध्या मिळत असलेल शिक्षण हे व्यावहारिक दृष्ट्या उपयोगी नाही ते जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत करत नाही फक्त काही मोजक्याच मुलांना त्याचा फायदा होताना दिसून येतो व समाजातील मोठा वर्ग हा शिक्षण घेवूनही या फायद्या पासून वंचित राहिला जातो, तो का बरे ?

आपल्या भारत देशात आताची शिक्षकांची अवस्थाच अशी आहे कि त्यांनाच त्यांचा पगार वेळेत मिळेल याची खात्री नसते. अ शैक्षणिक कामे त्यांचा कधी पिच्छा सोडत नाहीत. परक्या गावात असणारे नोकरीचे ठिकाण. या सर्व गोष्टी ज्ञान प्रदान करण्यास लागणाऱ्या क्षमतेस खूपच हानी पोहोचवतात. मानसिक बैठक पक्की होवू शकत नाही व आलेला दिवस पुढे ढकलणे हेच कार्य बहुतेक शिक्षक करत असतात. या कारणामुळे ते हि त्यांच्या विद्यार्थ्यांच्यात शिक्षणाविषयी, ज्ञानाविषयी गोडी निर्माण करण्यात रस दाखविताना कमी पडत असलेले दिसून येतात . याचीच प्रतिक्रिया म्हणजे त्यांचे विद्यार्थीही असा समज करून घेतात कि त्यांच्या शिक्षकांना काहीच येत नाही वा ते मनापासून शिकविण्यात समरस होत नाहीत त्यामुळे विद्यार्ध्यांचा असा ग्रह बनतो कि चांगले शिक्षण हे फक्त मोठ्या शहरातच व चांगल्या शिक्षण संस्थेतेच मिळू शकते. हीच कारणे विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी, रस व श्रद्धा सातत्याने कमी करत असतात .

कोणताही शैक्षणिक प्रवास यशस्वी करावयाचा झाल्यास प्रथम गुरूला त्याच्या स्वत: मध्ये उत्साह ,भविष्याची उज्वल आशा व सातत्याने ज्ञानाची आस प्रामाणिक पणे जागवावी लागणार आहे. तरच तो या गोष्टी त्याच्या विद्यार्थ्या मध्ये सुकर पणे रुजवू शकेल.

विद्यार्थ्यांनी हि मनोमन निश्चय करून, विद्यार्थी दशेत आळस झटकून, खूप कष्ट करण्याची, शिकविलेली गोष्ट पुन्हा पुन्हा नव्याने शिकण्याची, तयारी ठेवली पाहिजे त्यांनीही एखादी गोष्ट जिज्ञासा पूर्वक शिकण्यासाठी स्वत: लाच, का, कसे, केव्हा , कुठे , कशी असे प्रश्न विचारून स्वत: प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे व त्या संबधीची पुस्तके, ग्रंथ स्वत: चाळली पाहिजेत. एखाद्या ज्ञान शाखेविषयी गोडी निर्माण होण्यासाठी याच मुलभूत गोष्टी आहेत.

ज्ञान हे अथांग आहे. त्यामुळे आपणास जी ज्ञान शाखा रुचेल, पटेल, आवडेल जिथे आयुष्यभर काम करण्याची गोडी वाटेल हे विद्यार्थाने स्वत: शोधले पाहिजे. व एकदा निर्णय घेतल्यावर मनापासून श्रद्धा ठेवून अभ्यास व कष्ट केले पाहिजेत मग यश हे दूर नसून सहज साध्य असा आनंदमयी प्रवास ठरेल

आपल्या जीवनात आपणास चांगले शिकविणारी व मार्गदर्शन करणारी प्रत्येक व्यक्ती हि गुरूच असते. गुरु पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छ्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: